Historical Places

तासगाव शहराचे दैवत
नवसाला पावणारा उजव्या सोंडेचा गणपती
श्री गणपती पंचायतन देवस्थान,तासगाव
इसवी २०१६, शके १९३८


 

गणपती रथोत्सव


पश्चिम महाराष्ट्र हा विविध उत्सव, सण व वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम साजरे करण्यासाठी नेहमीच अग्रेसर आहे,याच पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक गावांची,तालुक्यांची व जिल्ह्यांची खास अशी ओळख आहे. या पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एक ऎतिहासीक वारसा लाभलेले शहर म्हणजे - तासगाव


या तासगावला काशिविश्वेश्वर व सिद्धीविनायकाचा वरदहस्त आहे. तासगावचा रथोत्सव हा संपुर्ण महाराष्ट्रात आकर्षणाचा व उत्साहाचा केंद्रबिंदु आहे.हा रथोत्सव जवळ जवळ अडीच शतके वाटचाल करित असुन प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातॊ.


मराठा साम्राज्याचे तासगाव मधील पेशवेकालीन सरदार श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन हे गणपतीचे निस्सिम भक्त होते. यांनी तासगाव मध्ये दाक्षिणात्य पद्ध्तीचे व हेमाडपंथी कलेचा मेळ साधत अतिभव्य मंदीर बांधले. हे महाराष्ट्रातील गोपुर असलेले एकमेव प्राचीन मंदीर आहे. पुढे परशुरामभाऊ पटवर्धन यांनी गणेशोत्सवाच्या काळात गणपतीचा रथोत्सव सुरु केला.


याच उजव्या सोंडेच्या गणपती मंदिरात दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी आकर्षक व भव्य असा रथ बनविण्यात आला. हा रथ साधारणपणे तीन मजली इमारतीएवढा आहे. गणपतीच्या मिरवणुकीसाठी हा रथ केळीचे खांब, फुलांच्या माळा,नारळाचे फड, फुगे व कापडांच्या झालरींनी सजविला जातॊ. हा रथ सागवानी लाकुड व चांगल्या प्रतीच्या लोखंडापासुन तयार करण्यात आला आहे.


रथोत्सवाचा प्रारंभ गणपती मंदिरापासुन करण्यात येतो. या मंदिराच्या समोर अर्धा किलोमीटर अंतरावर काशिविश्वेश्वराचे मंदीर आहे.तेथे हा रथ नेण्यात येतो. पितापुत्रांच्या भेटीचा तो क्षण पाहण्यासारखा असतो.महादेवाची भेट झाली की परत हा रथ गणपती मंदिराकडे येतो.या रथाला भाले मोठे दोर बांधुन हा रथ असंख्य गणेशभक्त ओढतात. भक्तगण मोरया मोरया असा गजर करत रथ ओढण्यासाठी उत्साहाने भाग घेतात. रथाचे मानकरी रथ ओढणार्‍या भाविकांवर गुळ-खोबरे,पेढ्यांची उधळण करतात,त्यांना रथ ओढायला उत्साहित करतात.या रथाचे मार्गक्रमण पुर्ण करण्यास ५-६ तास लागतात. रथ फिरुन परत गणपती मंदिराकडे येताना सुर्य मंदिरामागे गेला तर रथ आहे त्याच ठिकाणी थांबवितातव त्या रथातील गणेशाची मुर्ती पालखीतुन वाजत गाजत नेऊन विसर्जन करतात.


आजही श्रीमंत पटवर्धनांचे वंशज श्री गणपती पंचायतनचे विश्वस्त,रथाचे मानकरी, सांगली जिल्ह्याचे राजकीय मान्यवर,सामाजिक कार्यकर्ते,व्यापारी,प्रशासकीय अधिकारी हजर असतात.हा रथोत्सव तासगावच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग असलुआमुळे येथे गर्दीचा महापुर लोटतॊ.याचे गांभिर्य लक्ष्यात घेऊन अत्यंत कडेकोट बंदोवस्त असतो.


असा हा वैविध्यपुर्ण रथोत्सव पाहण्यासाठी सांगली, सातारा , कोल्हापुर व कर्नाटकातील लाखो गणेशभक्त येतात.


गणेशाच्या शाडुच्या मुर्तीचे विसर्जन करतात व नेहमीप्रमाणे सकाळी राजावाड्यामध्ये श्रीमंत राजेंद्र पटवर्धन साहेब यांच्या हस्ते आरती करुन दुपारी बारा वाजता वाद्यांच्या गजरात पालखीमधुन पंचधातुच्या १२५ किलो वजनाच्या मुर्तीचे आगमन राजावाड्यात होते.


पालखी समोर पारंपारीक वाद्यांचे वादन सुरु असते.संस्थानची गौरी हत्तीण दिमाखात पालखीपुढे व रथापुढे असते.पालखीमधुन दोन्ही गणेशाच्या मुर्ती आणुन रथामध्ये ठेवतात तदनंतर रथ ओढ्ण्यासाठी भाविकांची झुंबड उडते. रथ काशिविश्वेश्वर मंदिराजवळ आल्यावर पंचधातुची व शाडुची मुर्ती कापुर ओध्यानजीक विहिरी पर्यंन्त नेऊन आरती करुन शास्त्रशुद्ध पद्धतीने मातिच्या मुर्तीचे विसर्जन करतात.


यासाठी स्वताः श्रीमंत राजेंद्र पटवर्धन व शहरातील मान्यवर रथोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असतात.


उजव्या सोंडेच्या, नवसाला पावणार्‍या दीड दिवसाच्या गणेश उत्सवाच्या गणरायाचा सर्वांना आशीर्वाद....